समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी; चालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा झोपेच्या डुलकीने दोन निष्पाप प्रवाशांचा बळी घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी परिसरात चॅनेल क्रमांक ४२६ जवळ चालकाला डुलकी लागल्याने वाशिमवरून मुंबईला जाणारी चाणक्य ट्रॅव्हल्सची बस पुलाच्या कठड्यावर आदळून पलटी झाली; या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर ३० प्रवासी जखमी झाले आहेत. रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

 काही फुटांवरच होती खोल खाईमिळालेल्या माहितीनुसार, वाशिम येथून प्रवासी घेऊन चाणक्य ट्रॅव्हल्सची (क्रमांक  ४१ ९९५५) बस मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून धावत होती. सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक ४२६ जवळ रात्री १ वाजेच्या सुमारास चालकाला अचानक झोपेची डुलकी लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस पुलाच्या कठड्यावर जोरात आदळून जागेवरच पलटी झाली. ज्या पुलावर ही बस पलटी झाली, त्याच्या बाजूला अवघ्या काही फुटांवर खोल खाई होती. जर बसने कठडा तोडून खाईत कोसळली असती तर मोठी जीवितहानी झाली असती; परंतु बस पुलावरच अडकून पलटी झाल्याने अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. अपघाताची माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डॉ. सोनाली पाईकराव यांनी पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. फुलंब्री पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजता मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पोउपनि राम बारहाते, जमादार लालचंद नागलोड, जमादार अंकुश बागल व चालक चाटे यांनी मदतकार्य केले.

मृतांत पुसदच्या तरुणाचा समावेश; जखमींमधील चौघांची प्रकृती गंभीर 
मृतांची माहिती: या अपघातात उत्तम रामू जाधव (वय ३५, रा. पुसद) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्यासोबतच्या दुसर्‍या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमींची नावे: अपघातात ३० प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये अनुराधा परदेशी (४५), कृष्णा बांधणकर (१०), आरती बांधणकर (३५, रा. मुलुंड), अरुणा बोबिलकर (४३, रा. कल्याण), गयाबाई मालवणकर (४०), दिव्या जाधव (२५), शिवनेरी राठोड (१५), नंदिनी राठोड (२६, रा. यवतमाळ), प्रगती मनोहर (२२), रेखा लोणे (३५), खुशी लोणे (९), सुरभिता लोणे (६५), ओम लोणे (१, सर्व रा. वसई), रमेश ढोबळे (६०), मोहम्मद (३०, रा. पुसद), करण खडसे (१७, रा. पुसद), अनुज खडसे (१६), शैलेश ढोबळे (२६, रा. ठाणे), वंदना ताकले (३२, रा. छत्रपती संभाजीनगर), वैभव ढोलकर (३३, रा. दिग्रस), भुरन विनायक (२८, रा. यवतमाळ), उद्धव बोंडकर (४०, रा. ठाणे), सुमित (३१, रा. वाशिम), वंदना राठोड (३२, रा. मुंबई), विशाल शिरसाट (२५, रा. वाशिम) आणि शरद पाईकराव (३५, रा. ठाणे) यांचा समावेश आहे.